वाशिम : गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये वोट फॉर नोट चा सर्रास वापर करण्यात येतो. यातूनच बनावट नोटा चलनात आणण्याचाही प्रयत्न होतो. नेमकी हीच बाब हेरून जिल्हा पोलीस यंत्रणा व निवडणूक विभागाने गुप्त यंत्रणा कामाला लावून बनावट नोटा चलनात येत तर नाहीत ना यावर करडी नजर ठेवली असल्याची माहिती हाती आली आहे. आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर आघाडीत बिघाडी झाल्यानंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसही स्वबळ आजमावित निवडणुकीत दोन हात करण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.प्रमुख राजकीय पक्षांकडून होणार्या मतविभाजनाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारिप बहुजन महासंघानेही कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावत मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवित आहे. यातूनच ह्यवोट फॉर नोटह्ण सूत्र जन्माला आले आहे. मतदारांना होणारी पैशांची वाटप लक्षात घेता बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटदेखील सक्रिय झाले आहे.निवडणुकीची संधी साधत या रॅकेटकडून बनावट नोटा चलनात आणल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.निवडणूक काळातील उमेदवारांच्या मागील कार्यकर्त्यांचा ताफा, नेते व पदाधिकार्यांची व्यवस्था, प्रतीदिन होणार्या जेवणावळी आणि प्रचारावर होणारा खर्च लक्षात घेता निवडणूक ही सर्वसामान्य आणि गोरगरिबांची राहिली नाही. राजकारणात लक्ष्मीपुत्रांचा सहभाग वाढला आहे. उमेदवार विजयी झाल्यानंतर पुढची पाच वर्षे मतदारसंघात चेहराच दाखवित नसल्याने अनेक ठिकाणी मतदारांची पैसे घेऊन मतदान करण्याची प्रवृत्ती वाढतच आहे. हा धोका लक्षात घेत काही उमेदवार बनावट नोटा चलनात आणणार्या टोळीशी संधान तर साधत नाहीत ना, या दिशेने पोलिसांकडून गोपनीय माहिती काढणे सुरू आहे.
निवडणूकीतील बनावट नोटांवर पोलिस प्रशासनाची करडी नजर
By admin | Updated: October 10, 2014 00:53 IST