वाशिम: योग साधनेच्या माध्यमातून बंदिस्त कैद्यांच्या आरोग्य आणि मानसिकतेमध्ये बदल घडावा या दृष्टीने कारागृहातील कैद्यांना ६ जानेवारी ते १३ जानेवारीदरम्यान योगाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. एखाद्या गुन्ह्यात नकळत अडकलेल्या कैद्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. यामुळे अनेकदा निरपराध कैदी मोठय़ा गुन्हेगारीकडे वळतो. अशा कैद्यांची मानसिकता बदलविण्याची नितांत गरज असते. हे हेरून वाशिम येथील योग प्राणायाम शिक्षकांनी जिल्हा कारागृहातील कैद्यांना योगाचे धडे देऊन त्यांना मानसिक समाधान देण्याचे कार्य सुरू आहे. छोट्या-मोठय़ा गुन्ह्यातील अनेक आरोपी जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत किंवा अनेकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. यात अनेक जण कदाचित निरपराधही असू शकतात; मात्र ही न्यायालयीन बाब आहे. जिल्हा कारागृहातील असलेला कैदी हा वेगळ्या मानसिकतेतून जात असतो. त्यांची मानसिकता ढासळू नये, यासाठी व त्यांना समाजात पुन्हा तीच वागणूक मिळेल या अपेक्षेसह वाशिम येथील ह्यआर्ट ऑफ लिव्हिंगह्णच्या माध्यमातून ६ जानेवारीपासून कारागृहातील कैद्यांना योग प्राणायामचे धडे गिरविण्यात येत आहेत. योगातून कैद्यांची बनलेली मानसिकता बदलविण्याचा मोठा योग यातून करण्याचा प्रयत्न योग शिक्षकांनी केला आहे. कैद्यांना योग शिक्षक विजय चव्हाण मार्गदर्शन करीत आहेत. सदर शिबिर कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे, ए.व्ही. वानखेडे, एन.आर. साबळे यांनी आयोजित केले आहे. या शिबिराचा बहुसंख्य कैदी व कर्मचार्यांना लाभ मिळत आहे.
वाशिम जिल्हा कारागृहातील कैद्यांना योगाचे धडे
By admin | Updated: January 11, 2016 01:42 IST