कार्ली (वाशिम): किन्हीराजा ३३ के व्ही विद्युत उपकेंद्रावरुन अनियमित कमी दाबाच्या व आठवड्यातून ३ दिवस ६ तास वीज पुरवठा करणार्या महावितरण विरोधात परिसरातील शेतकर्यांनी आज औरंगाबाद - नागपूर हायवेवर रास्ता रोकोचा प्रयत्न केला; मात्र पोलिस प्रशासन व महावितरणने यशस्वी मध्यस्थी करुन दररोज सहा तास वीज पुरवठा करण्याचे मान्य करुन शेतकर्यांचा संताप शांत केला. किन्हीराजा उपकेंद्रावरील एरंडा फिडर अंतर्गत कार्ली, किनखेडा, दुबळवेल, गुंज, तोरनाळा, जोडगव्हाण, पांगरी धनकुटे आदी गावांना मागील कित्येक महिन्यांपासून वरील उपकेंद्रावरुन आठवड्यातून केवळ दोन ते तीन दिवस तोही कमी दाबाच्या अनियमित ६ तासाचा विद्युत पुरवठा होत असल्याने या भागातील बळीराजासह सर्वसामान्य नागरिक जेरीस आला आहे. खरिपाचे पीक हातचे गेले आहे. उरल्यासुरल्या आशा रब्बीवर असताना पाणी असूनही केवळ विजेअभावी रब्बीचा पेरा धोक्यात आला. याबाबतची कैफीयत जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यकारी अभियंता यांनाही दिली होती व यावर विचार न झाल्यास १ तारखेला रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला होता; मात्र लालफीतशाहीत अडकलेल्या दप्तर दिरंगाईसाठी माहीर असलेल्या अधिकार्यांनी यावर काही एक ठोस पाऊल न उचलल्यामुळे या परिसरातील शेतकर्यांनी औरंगाबाद - नागपूर हायवेवर चक्काजाम आंदोलनाचे पाऊल उचलले. त्या आंदोलनानंतर महावितरणने ५ नोव्हेंबर पासून सुरळीत ८ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले; मात्र या आश्वासनाला महावितरण न जागल्याने परिसरातील शेकडो शेतकरी महावितरणच्या किन्हीराजा कार्यालयावर धडकले व पुन्हा चक्काजामचा इशारा प्रभाकर लांडकर यांच्या नेतृत्वात दिला. सोबतच आमच्या मागण्या मान्य न करणार्या अधिकार्यांना बांगडी भरण्याचा दमही दिला. यावेळी महावितरणच्यावतीने कनिष्ठ अभियंता पवार, ऑपरेटर हाके, लाईनमन निलेश गोंडाळ यांनी आपबिती समजून घेतली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जउळका पो.स्टेशनचे ठाणेदार किरणकुमार सावळे, पीएसआय आरसेवार कैलास राठोड व स्टेशनचा पुनर्ताफा घटनास्थळी हजर होता.
.. अखेर शेतक-यांना सहा तास नियमित वीज पुरवठा
By admin | Updated: November 9, 2014 01:09 IST