जिल्हा दौऱ्यावर आलेल्या जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सिंचनविषयक विविध विषयांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मालेगाव तालुक्यातीलच सोनल मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण योग्य रीतीने होऊन पाण्याचा सिंचनासाठी अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. कालव्यांव्दारे या प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी पुरविले जाणार असून कालव्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाकडे सादर करावा. पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी आणि घरांचा मोबदला देण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. याबाबतचा प्रस्तावही तातडीने नियामक मंडळापुढे सादर करावा. मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी प्रकल्पाचे साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा सिंचन वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला होता. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
पांगराबंदी प्रकल्पातून उपसा पद्धतीने सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST