अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त पथकाने २८ जुलै रोजी तोंडगाव येथील ४, तामसाळा येथील १ व हिस्से बोराळा येथील ६ खदान, क्रेशरची अचानकपणे भेट देऊन तपासणी केली. या सर्व खदानधारक व क्रेशरधारकांनी परवाना दिनांकापासून आतापर्यंत किती प्रमाणात उत्खनन केले आहे, उत्खननाच्या अनुषंगाने स्वामित्वधनाचा किती भरणा केला आहे. तसेच ईटीएस मशीनद्वारे खदानीची मोजणी झाली असल्यास त्याची प्रत व ब्लास्टिंग ज्या व्यक्तीमार्फत करण्यात येते, त्या व्यक्तीच्या परवान्याची प्रत तत्काळ तहसीलदार कार्यालयात सदर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
००००००००००००
वाहनावर कारवाई करण्याच्या सूचना
जिल्हास्तरीय भरारी पथकाने तोंडगाव-वाशिम मार्गावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी केली. या ट्रक चालकाकडील गौण खनिज वाहतूक पावतीची पडताळणी केली असता, या पावतीची वैधता संपली असल्याचे आढळून आले. हा ट्रक वाशिम पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना वाशिमचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.
०००
भरारी पथकामार्फत यापुढेही कारवाई
गौण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारे अचानक तपासणी करून अवैध वाहतूक व उत्खननप्रकरणी कारवाई केली जाणार आहे, असे अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी स्पष्ट केले.