मंगरूळपीर (वाशिम) : यावर्षीच्या अल्प पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले ही बाब लक्षात घेऊन मदत व पुनर्वसन मंत्रालय सचिव तथा वाशिम जिल्हा पालक सचिव यांनी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्यांशी चर्चा केली.अंबापूर येथील चंद्रभागा मनवर व बिटोडा भोयर येथील शेतकरी आनंदा भोयर, रामराव भोयर, रामदास भजने यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. या प्रसंगी शेतकर्यांनी आपल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीची वाशिम जिल्हा सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली असताना शेतकरी म्हणाले, सोयाबीनचे पीकाचे पाण्याअभावी नुकसान झाले. तूरीच्या पिकाची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सोयाबीन यावर्षी हेक्टरी १ ते २ क्विंटल झाले. तूरीच्या उत्पन्नातही प्रचंड घट होणार आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी काही शेतकर्यांनी सोयाबीन काढणीचा खर्च सुद्धा निघणे शक्य नसल्यामुळे सोयाबीन काढलेच नाही असे सांगीतले. या प्रसंगी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा कृषि अधीक्षक चव्हाण, कारंजा उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.मुरली इंगळे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, पं.स. सभापती भाष्कर शेगीकर, तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार साळवे, तालुका कृषि अधिकारी एम.जे.अरगडे, पं.स.सदस्य शेरूभाई फकिरावाले, संजय कातडे आदी उपस्थित होते.
दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी
By admin | Updated: November 29, 2014 23:39 IST