वाशिम : अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या गॅस सिलिंडरचे घरपोच वितरण केले जात आहे. मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य नसल्याने, कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही.
संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. दरम्यान, कोरोनाकाळात तसेच कडक निर्बंधाच्या काळात घरपोच गॅस सिलिंडर पोहचविणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मात्र लसीकरणात प्राधान्य देण्यात आले नाही. जीवावर उदार होऊन डिलिव्हरी बॉय घरपोच सेवा देत असल्याने त्यांना लसीकरणात प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. वाशिम शहरात ५२ हजाराच्या आसपास गॅस सिलिंडर जोडणी आहेत. कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात यावा, असा सूर उमटत आहे.
०००
सिलिंडर सॅनिटाईझ केले का?
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सिलिंडर घरात नेण्यापूर्वी सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. सॅनिटाईझ केल्याशिवाय सिलिंडरला हात लावू नये. लहान मुलांना सिलिंडरपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. पूर्णपणे सॅनिटाईझ केल्यानंतरच घरात सिलिंडर न्यावे.
००००
४ डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह
कोरोनाकाळात घरपोच सेवा देताना आवश्यक ती खबरदारी डिलिव्हरी बॉयकडून घेण्यात येते. तथापि, दुसऱ्या लाटेत चार डिलिव्हरी बॉय यांना कोरोना संसर्ग झाला. सौम्य लक्षणे असल्याने चार जणांनी कोरोनावर सहज मात केली. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. त्यामुळे लसीकरणात प्राधान्य द्यावे, असा सूर उमटत आहे.
००००
कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी
कोट
कोरोनाकाळातही घरपोच गॅस सिलिंडर पोहचविण्यात येत आहे. प्रत्येक ग्राहकाशी जवळून संपर्क येत असला तरी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. लसीकरण झाले तर अत्युत्तम ठरेल.
- माधवराव गावंडे, डिलिव्हरी बॉय
०००००००
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, डिलिव्हरी बॉयला यामध्ये प्राधान्य नाही. घरपोच सेवा दिली जात असल्याने लसीकरणात प्राधान्य असावे.
- संतोष बांगर, डिलिव्हरी बॉय
०००००००
शहरी व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आम्ही तर घरपोच सेवा देत असतानाही लसीकरणात प्राधान्य नाही. त्यामुळे लसीकरण झाले नाही. गॅस सिलिंडर घरपोच पोहचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय, चालकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे.
- परवेश राऊत, डिलिव्हरी बॉय
००००
शहरातील एकूण घरगुती ग्राहक - ५२०००
गॅस वितरित करणाऱ्या एजन्सी - ४
घरपोच डिलिव्हरीसाठी असणारे कर्मचारी - ३२
किती कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस - ११
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस - ०२
एकही डोस न घेणारे कर्मचारी - २१
००००००००००००००