रिसोड : रिसोड तालुक्यात काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीतही गटबाजी वाढत असल्याचे दिसत आहे.
रिसोडला वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. माजी कॅबिनेट मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख, खासदार भावना गवळी, माजी कॅबिनेट मंत्री स्व. सुभाष झनक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबाराव पाटील खडसे, आमदार अमित झनक, माजी आमदार विजयराव जाधव यांचे राजकीय वर्चस्व अद्याप कायम आहे ; परंतु गटबाजी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहे. रिसोड येथे काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे सर्वश्रुत आहे. भाजपामध्ये देखील दोन गट असून शिवसेनेतही हीच परिस्थिती आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीतही दोन गट सक्रिय झाले. काही दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षक रिसोडला आले असता दोन ठिकाणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे दोन ए.बी. फॉर्म प्राप्त झाले होते आणि दोन्ही फॉर्म निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले. अमित पाटील खडसे यांचा फॉर्म वैध ठरविण्यात आला, अशी नाट्यमय घटना राष्ट्रवादीत घडली.
रिसोड शहरामध्ये बाबाराव पाटील खडसे यांचा एक गट, तर अंकुश देशमुख, दिलीप बोरकर, गजानन आरु यांचा एक गट सक्रिय झाला असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.