अनसिंग परिसरात ३० पेक्षा अधिक गावे असून, त्यांचा दैनंदिन अनसिंगशीच संबंध येतो. गावात ग्रामीण रुग्णालयासह विविध ठिकाणी खासगी दवाखाने असून, गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे. सध्या तापाचे रुग्ण सर्वाधिक प्रमाणात असून उपचार घेण्याकरिता दवाखान्यात आल्यास तपासणी करण्यापूर्वीच काही डाॅक्टरांकडून आधी कोरोना चाचणी करा, असे बंधन घातले जात आहे. चाचणी केल्यानंतर अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास दवाखान्यातच भरती राहावे लागणार, कुटुंब व नातेवाइकांपासून दूर व्हावे लागणार, या भीतीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्याऐवजी मेडिकलवरून ताप उतरण्याची औषधी घेऊन घरचा रस्ता धरत असल्याचे दिसून येत आहे.
..................
बाॅक्स :
कंपाउंडर लोकांना सुगीचे दिवस
शहरांमध्ये मोठमोठ्या डाॅक्टरांच्या दवाखान्यांमध्ये कंपाउंडर म्हणून काम करणाऱ्या अनेकांना गावखेड्यात डाॅक्टर म्हणूनच ओळखले जाते. कोरोनाच्या संकट काळात अशा लोकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. अनेकजण दवाखान्यात जाण्याऐवजी संबंधित कंपाउंडरकडूनच औषधी लिहून घेत त्याआधारे बरे होण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा होत असून, आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर गोरे यांनी केली आहे.