शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रिसोड तालुक्यातील केनवड येथे मागील काही दिवसापासून हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पंचाहत्तरी पार झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावातील नागरिकांच्या तपासणी सुरू आहेत. १६ रुग्ण आपापल्यापरीने खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर जवळपास ६० रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मागील दोन-तीन दिवसात केनवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व ५० टक्के आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे रुग्ण तपासणीत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी उपलब्ध पर्यायी व्यवस्थेच्या आधारावर रुग्ण तपासणी सुरू असल्याची माहिती रिसोड तालुक्याचे आरोग्य अधिकारी पी.एन. फोकसे यांनी दिली. दरम्यान, गावात वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता सोमवार ते रविवार कोरोना दक्षता समितीने जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केनवड येथे सुरू असल्याची माहिती सरपंच नीता गोळे व पोलीसपाटील माणिक खराटे यांनी दिली.
केनवड येथे कोरोना रुग्णांमध्ये वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:08 IST