ऑनलाइन लोकमत
कामरगाव (वाशिम), दि. 23 - येथील शासकीय दवाखान्यानजिक असलेल्या कृष्णा कॉलनीमध्ये दररोज अनेक घरांमध्ये सापांची पिल्ले दिसून येत होती. सदर पिल्ले बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ अनेक दिवसांपासून वास्तव्यास असल्याचे २३ एप्रिल रोजी दुपारी आढळून आले. नाल्यानजिक प्लास्टिकखाली शेकडो सापांसह त्यांची पिल्ले बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.
कामरगाव येथील सरकारी दवाखाना जवळ ग्रामपंचायतचा मोठा नाला आहे. हा नाला मागील बऱ्याच महिन्यांपासून ग्रामपंचायतच्यावतीने स्वच्छ करण्यात आला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी व आजूबाजुच्या घरांमध्ये मागील काही दिवसापासून सापाची लहान पिले निघत होती. नाला हा नादुरुस्त असल्याने सर्पमित्राला सुध्दा ही सापाची पिले त्या ठिकाणाहुन काढता आली नाही. गावातील नागरिक प्रकाश गावंडे, ओमप्रकाश तायडे, दिनेश गावंडे, सलीम आकबानी, योगेश जाधव, दिपक साबु, , डॉ.गजानन मुंदे, सुनिल मुंदे, खोेपे आदिंनी ग्रामपंचायतमध्ये जावून नाला साफ करावा व तेथील सापांची व पिल्लाची विल्हेवाट लावण्याची मागणी केली.