खामगाव: अशिक्षीत असुनही एखाद्या प्रशिक्षित डॉक्टराप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांचे बाळंतपण करून प्रसंगी त्यांची काळजी घेणारी सुईन अर्थात दायी आज काळाच्या ओघात हरवली आहे. सुईनची शासनदरबारी उपेक्षाच झाल्याची खंत विमल खरात यांनी व्यक्त केली. तालुक्यातील बोरीअडगाव येथील विमल मधुकर खरात (५८) यांना वयाच्या अगदी तेराव्या वर्षीपासूनच सुईनचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला. ग्रामीण भागात गत ३५ वर्षापासून अडलेल्या महिलांचे बाळंतपण करून देण्याचे काम त्यांनी केले आहे. एखाद्या महिलेचे बाळंतपण असले की त्या आईसोबत सोबत राहायच्या. साधारणत: तीन दशकापूर्वी ग्रामीण भागात दवाखान्याची व्यवस्था नसल्याने किंवा दवाखाना खेडेगावापासून दूर असल्याने बाळंतपणाची जबाबदारी दाईच पार पाडायच्या. विमलबाईंनी सासरी आल्यानंतरही दायीची भूमिका सुरुच ठेवली. हळुहळू त्यांची बोरीअडगावात दाई म्हणून ओळख झाली. त्या काळात एखादी गर्भवती स्त्री डॉक्टरांजवळ गेल्यास डॉक्टरही अगोदर विमलबाईला बोलावून त्या स्त्रीची कधी प्रसुती होईल, अशी विचारणा करत, यावरून विमलबाईचे महत्व अधोरेखीत होते. आताच्या काळात सिझेरींगचे वाढते प्रमाण पाहता विमलबाई म्हणतात, आताच्या स्त्रीया गर्भवती राहिल्यानंतर सोनोग्राफीवर अवलंबून राहतात. प्रसुतीपूर्वी आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याने सिझेरींगचे प्रमाण वाढले आहे. प्रसुती काळात त्रास सहन करण्याची क्षमता सध्याच्या स्त्रीयामध्ये नाहीच, असेही त्या सांगतात. रात्री-बेरात्री पावसाळ्यात विमलबाई एखाद्या महिलेच्या प्रसुतीसाठी जायच्या तेव्हा त्यांच्यासोबत पती मधुकर खरात सोबत करायचे. .
शेकडो बाळंतपण करणा-या ‘विमल माय’ची उपेक्षाच !
By admin | Updated: May 5, 2015 00:34 IST