जयदेव वानखडे - जळगाव जामोदभर उन्हाळ्यात येनगावात लागलेली आग ग्रामवासियांना चांगलेच चटके देवून गेली. तापमान ४५ अंश सेल्सीयसवर जाताना तसेच उन्हाचे चटके सहन होत नाही त्यातच आगीने होरपळलेल्या माणसांच्या मनाची काय स्थिती झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. परंतु जोपर्यंत माणुसकी जीवंत आहे तोपर्यंत निश्चीत अशा संकटांमधून सावरण्याचे बळ माणसाला मिळते हे तितकेच खरे आहे.११ एप्रिल रोजी लागलेल्या भीषण आगीत जळालेल्या आगग्रस्त घरातील भांडीकुंडी, कपडालत्ता, अन्नधान्य यासोबतच गृहपयोगी साहित्य जळाले आणि ३५ कुटुंबियांचे संसार रस्त्यावर आले. उघड्यावर आलेल्या या कुटुंबियांच्या आगीवर फुंकर घालण्यासाठी माणुसकीचे शेकडो हात सरसावले शासन त्यांचे काम करेल जेव्हा मदत देईल तेव्हा देईल त्याची वाट न पाहता गावकऱ्यांनी प्रेमाचा धर्म निभावला. सर्व गावकऱ्यांनी या आगग्रस्तांना जेवण दिले. शासनाची माणसे सर्व्हेसाठी गेली ३५ कुटुंबांची धग शेवटी १० कुटुंबावर येवून थांबली दुसऱ्या दिवशी पंचनामे करून १० लाखाचे नुकसान दाखविण्यात आले. पहिल्या दिवशी ३५ कुटुंबाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु सदर यादीमध्ये एकाच कुटुंबातील अधिक नावे असल्याने आकडा वाढला. दुसऱ्या दिवशी मात्र स्वत:हून गावकऱ्यांनी पुढाकार घेवून खरोखर ज्यांना आगीची झळ पोचली अशा दहा आगग्रस्त कुटुंबांची माहिती दिली. आगग्रस्तही पुढे आलेत. त्यामध्ये पुर्णत: बाधीत झालेले दहा कुटुंबांचा पंचनामा ग्रामसेवक धोटे, पोलिस पाटील तायझोडे, मंडळ अधिकारी उकर्डे आणि तलाठी श्रीनाथ यांनी केला. त्यामध्ये संतोष फत्तुजी दामोदर (वय ३५ हजार), साधनाबाई रामहरी भारसाकळे (१ लाख २५ हजार), भगवान श्रावण जवंजाळ (७५ हजार), आनंदा सुगदेव वानखडे (१लाख ५ हजार), एकनाथ सुगदेव वानखडे (६२ हजार), प्रदीप प्रल्हाद वाघ (१लाख ७५ हजार), या पुर्णत: बाधीत १० आपदग्रस्तांचा समावेश करण्यात आला. आणि एकुण १० लाख १९ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. यामध्ये २ घरे अंशत: बाधीत झालेली असून १ गोठा पूर्णत: जळून नुकसान झाल्याचे म्हटले आहे. येनगाव येथील आगग्रस्तांना आज रोजी आ.डॉ.संजय कुटे यांनी भेट दिली. जळालेल्या घरांची पाहणी करून सर्व आपदग्रस्तांचे सांत्वन केले. व शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. तसेच तहसिलदार हेळकर यांनी येनगाव येथे जावून दहा कुटुंबियांना प्रत्येकी ३ हजार ८०० रूपये अनुदानाचे वाटप केले.माणुसकीचे हात पुढे सरसावलेयेनगाव वासियांवर आगीचा प्रसंग आल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांना सहकार्य देण्यात आले. १२ एप्रिल रोजी ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आणि संध्याकाळी मराठा क्रांती मोर्चाचे विद्यमाने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तर रेड स्वस्तिक या सामाजिक संघटनेच्यावतीने डॉ.अजित जाधव, सचिन देशमुख यांच्या चमुने भेट देवून या आगग्रस्त १२ कुटुंबियांना भांडी, कपडे आणि ब्लँकेटचे वाटप करून माणुसकीचा प्रत्यय दिला. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून संबंधित आपदग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले. प्रशांत तायडे यांनी येत्या १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी गावजेवण किंवा अनाठायी होणारा खर्च कमी करून येनगाव येथील आपदग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.