रिसोड (जि. वाशिम ): शहरामध्ये भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडीच्या झालेल्या घटनांमध्ये २ लाख २५ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. दोन्ही घटना २३ रोजी सकाळी ९ ते १ वाजताच्या सुमारास हिंगोली रोडवर महानंदा कॉलनी येथे घडल्यात. हिंगोली रोड येथील निवासी किसन अग्रवाल यांच्या घरामध्ये कुणीच नसल्याचे बघून अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश घेतला. कपाटामधील १ लाख ८४ हजारांचे सोन्याचांदीच्या दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ५0 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील पाच जोड, तीन अंगठय़ा, कानातील जोड, चांदीचे पूजेचे शिक्के यांसह इतर दागिने मिळून एकूण १ लाख ८४ हजार रुपये व रोख ९00 रुपये असा एकूण १ लाख ८४ हजार ९00 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. घरमालक अग्रवाल यांची अडत असून, सकाळी ९ वाजता व्यवसायासाठी ते बाहेर पडले, तर पत्नी माहेरगावी गेली आहे. भरदिवसा चोरी झाल्यामुळे शहरात सर्वत्र चर्चेला विषय बनला आहे. दुसर्या घटनेत दुपारी १ वाजताच्या सुमारास महानंदा कॉलनीमधील शिक्षक संजय देशमुख यांच्या घरी चोरट्यांनी दरवाजा तोडून कपाटामधील १३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांची किंमत ४0 हजार रुपये आहे. घरमालक बाहेरगावी होते. घरामध्ये मागील बाजूस भाडेकरू राहतात. त्यांनी चाहूल लागताच चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; पण चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवून पळ काढला. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसर्या घटनेची फिर्याद दाखल झाली नाही. भरदिवसा दोन घरफोड्या झाल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या वर्षात चोरीच्या घटना क्वचित आहेत, पण एकाच दिवशी दोन चोर्या झाल्याने प्रशासन हादरला आहे.
रिसोड येथे भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या
By admin | Updated: May 24, 2016 01:58 IST