लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरात सुरू असलेले हगणदरीमुक्त अभियान आता हायटेक झाले आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत स्तरावर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथके सक्रिय करण्यात आली आहेत. आता या पथकांमध्ये आयुक्त, उपायुक्त, मुख्याधिकार्यांसह महापौर, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही समावेश असून, या पथकाने केलेल्या पाहणीचा अहवाल सादर करण्यासाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र’ नावाने प्रशासकीय व्हॉट्स अँप ग्रुप तयार करण्यात आला आहे. राज्यातील शहरे हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येक शहराने उघड्यावरील हगणदरीची ठिकाणे निष्कासित करण्यासाठी ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथके कार्यरत करण्याबाबतच्या सूचना शासनाकडून पूर्वीच देण्यात आल्या आहेत. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकांना अधिक सक्रिय होऊन दररोज पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करावे लागणार आहे. नगर परिषद, नगर पंचायत मुख्याधिकार्यांना त्यांच्या क्षेत्रातील ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकात स्वत: सहभागी होणे आवश्यक आहे. ‘क’ व ’ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्तांना स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे, तर, ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उपआयुक्त, सहायक आयुक्तांना पथकामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. या ‘गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग’ पथकात महापौर, नगराध्यक्ष व संबंधित वॉर्ड किंवा प्रभागाच्या नगरसेवकांनाही सहभागी करून घ्यावे लागणार आहे. या पथकाने उघड्यावरील हगणदरीच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर उघड्यावर शौचास करणारे व्यक्ती न आढळल्यास त्यानुसार अहवाल, तसेच उघड्यावर शौचास बसताना व्यक्ती आढल्यास आनुषंगिक करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्या उपाययोजनांचा अहवाल आयुक्त, नगर परिषद, नगर पंचायतींच्या मुख्याधिकार्यांना दररोज सकाळी ११ वाजता स्वच्छ महाराष्ट्र या नावाने सुरू केलेल्या व्हॉट्स अँप ग्रुपवर टाकावा लागणार आहे. त्याशिवाय शहरी भागातील सामुदायिक शौचालयांची अवस्था आणि देखभालीसह इतर बाबींचा अहवालही या ग्रुपवर टाकावा लागणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत हगणदरीमुक्तीत सातत्य राखण्यासाठी गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकाची स्थापना करण्यात आली आहेच. आता या पथकांमध्ये मुख्याधिकार्यांसह इतर अधिकारी आणि नगर परिषद, नगर पंचायतींच्या पदाधिकार्यांचाही समावेश राहणार असून, या पथकाकडून हगणदरीमुक्त झालेल्या शहरात पाहणी करून त्याबाबतचा अहवाल प्रशासकीय व्हॉट्स अँप ग्रुपवर टाकण्यात येणार आहे.-दीपक मोरे,जिल्हा प्रशासन अधिकारी,नगरपालिका प्रशासन जि. वाशिम.