लोकमत न्यूज नेटवर्क दापुरा: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बीसह उन्हाळी पिकांतील भुईमुगाचा पेराही वाढविला होता; परंतु या विषम वातावरणामुळे या पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही वसुल झालेला नाही. अनेक ठिकाणी भुईमूग काढणे परवडणारे नसल्याने शेतकऱ्यांनी त्या शेतात जनावरेच चरण्यासाठी सोडल्याची स्थिती आहे.जिल्ह्यात मागील सहा वर्षानंतर प्रथमच ६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली. मागील चार वर्षांच्या अवर्षणानंतर गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. तळे, विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा रब्बी पिकानंतर उन्हाळी पिकांचाही पेरा वाढविला. त्यामध्ये प्रामुख्याने भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक होते. गतवर्षी केवळ ३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र असलेल्या भुईमुगाचा पेरा यंदा ६ हजार हेक्टरहून अधिक म्हणजेच दुप्पट झाला होता. या पिकासाठी नांगरणी वखरणीचा खर्च १ हजार, बियाण्यांचा खर्च एकरी अडिच बॅगनुसार सहा हजार २५०, खते व पोषकद्रव्यांसाठी दोन हजार १००, पेरणी १ हजार, निंदण, डवरणी १ हजार ८००, फवारणी ७०० रुपये, काढणी पाच हजार आणि रखवालीसह पाणी देण्याची मजुरी १८हजार, तसेच इतर खर्च दोन हजार मिळून एका एकरासाठी जवळपास ३८ हजार रुपये खर्च आला; परंतु विषम वातावरणामुळे वरवर पिक हिरवेगार आणि जोमदार दिसत असले तरी, त्याला शेंंगाच धरल्या नाही. परिणामी या पिकाचे उत्पादन प्रचंड घटले. सरासरी एक क्विंटल भुईमुगाचे उत्पादन झाले. अनेक शेतकऱ्यांना, तर भुईमुगाची काढणी करणे परवडले नाही. त्यामुळे त्यांनी शेतात चक्क जनावरेच चारली. काही निवडक शेतकऱ्यांना चार क्विंटल उत्पादन झाले असले तरी, बाजारात या पिकाला किमान २ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने कुठल्याही स्थितीत या पिकाचा खर्च वसुल होण्याची शक्यता नाही.परिणामी, यंदा या पिकाची पेरणी करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. या पिकाचे उत्पादन घटण्याची दोन मुख्य कारणे शेतकरी सांगत आहेत. ती म्हणजे जानेवारीऐवजी फेब्रुवारीत म्हणजेच उशिरा केलेली पेरणी आणि एप्रिल महिन्यात वाढलेल्या प्रचंड उकाड्याच्या काळात तुषार सिंचनाच्या आधारे पाणी देणाऱ्यांच्या पिकांवर बुरशीचा प्रादूर्भाव झाला. परिणामी वरवर पिक हिरवे दिसत असतानाही त्याला शेंगा मात्र लागल्या नाहीत.
भुईमुगाच्या उत्पादनात प्रचंड घट
By admin | Updated: June 7, 2017 01:40 IST