वाशिम : संजय शेळके नामक ग्रामसेवकाला आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई, तसेच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन, जिल्हा वाशिमतर्फे १७ मार्च रोजी वाशिम पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पसार आरोपीस अटक होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामसेवक संघटनेने केला.वाशिम पंचायत समिती कार्यालयाजवळून या मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालय, सिव्हिल लाइन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी संघटनेच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार, ग्रामसेवक संजय शेळके यांनी वरिष्ठ अधिकारी व काही पदाधिकार्यांच्या जाचाला कंटाळून अकोला रोडवर असलेल्या एका शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतक शेळके यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये दोन विस्तार अधिकार्यांच्या नावांचा उल्लेख आहे, तर घरी लिहून ठेवलेल्या डायरीमध्ये अधिकार्यांसह पदाधिकार्यांची नावे नोंदविली आहेत. पोलिसांनी डायरित नाव असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. परंतु, उर्वरित काही जणांना ताब्यात घेण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट व डायरीमधील आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी लावून धरली. या मोर्चामध्ये वाशिम जिल्हय़ातील सुमारे ३५0 ग्रामसेवक, महिला ग्रामसेविका सहभागी झाले होते.
ग्रामसेवक आत्महत्याप्रकरणात दोषींना अटक करा!
By admin | Updated: March 19, 2016 01:13 IST