वाशिम : निष्काम सेवा हे ब्रीद घेवून मागील अनेक वर्षापासून पोलिस कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्या गृहरक्षक दलाची दर आठवड्याला होणारी साप्ताहीक परेड डिसेंबर २0१४ या महिन्याचा अखेरीस बंद करण्यात आली आहे. ही परेड बंद झाल्यामुळे राज्यातील ७0 हजार गृहरक्षक दलाच्या जवानावर मानधनापोटी होणारा सरकारचा खर्च वाचणार असून निष्काम सेवेलाही सरकारने काटकासरीची कात्री लावली आहे. दरम्यान, या परेडबाबत तीन महिने उलटून गेल्यावरही सरकारने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने होमगार्डचे अस्तित्वच संपविण्याचा घाट घातला जात असल्याची शंका होमगार्ड मध्ये व्यक्त केली जात आहे. १९४७ साली झालेल्या जातीय दंगली शमविण्यासाठी समाजातील सेवाभावी नागरिकांनी पुढाकार घेतल्याने समाजामध्ये एकोपा व शांततेचे वातारण निर्माण झाले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी गृहरक्षक दलाची स्थापना केली होती. आज राज्यात ६९ हजार जवान कार्यरत आहेत. राज्यात कोठेही जातीय दंगलीची परिस्थिती असो की, केंद्र किंवा राज्याच्या निवडणुका असोत, सण, उत्सव किंवा अन्य कोणत्याही घटना असोत पोलिस यंत्रणेवर कमालीचा ताण पडतो. हा ताण कमी करण्याचे काम मग गृहरक्षक दलाचे जवान करतात. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावतात. त्यांना ही शिस्त लावली ती, दर आठवड्याला होणार्या साप्ताहीक परेडमधून. या परडमध्ये पोलिसांप्रमाणेच शस्त्र चालविणे, लाठीकाठी चालविणे, शारीरिक कसरती याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा सामना करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र हीच परेड आता युती सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येणार्या काळात हळु हळु गृहरक्षक दलच मोडीत काढण्याचा शासनाचा विचार असल्याचे या क्षेत्रातील एका तज्ज्ञ जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर महिती दिली.
होमगार्डच्या निष्काम सेवेलाही सरकारची कात्री
By admin | Updated: February 28, 2015 00:58 IST