प्रफुल बानगावकर / कारंजा लाड : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अमरावती विभागातील ३६ प्रलंबित प्रकल्प शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती वाशिम लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांनी शुक्रवारी दिली. आमदार राजेंद्र पाटणी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी विदर्भ व मराठवाड्यातील मिळून १४ जलप्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. तथापि, अमरावती विभागातील आणखीही काही प्रकल्पांचे प्रस्ताव संबंधितांकडून मंजुरातीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांना मान्यता मिळाल्यास अमरावती विभागाच्या विकासात भर पडण्यास मदत होणार आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून माहिती घेतली असता, अमरावती विभागातील ३६ प्रकल्पांचे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कळले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक २३ प्रकल्पांचा समावेश आहे. कारंजा-मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांन या संदर्भात लघु पाटबंधारे विभाग वाशिम यांच्याकडून माहिती घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना मार्च महिन्यातच पत्र लिहिले होते. वाशिम जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता हा जिल्हा तापी खोर्याच्या दुभाजक रेषेवर असून, जिल्हय़ात बारामाही वाहणारी कोणतीही नदी नाही. त्यातच या जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने पाण्याचा शाश्वत स्रोत नाही. त्यामुळेच या जिल्ह्यात लघु पाटबंधारे योजना घेणे आवश्यक असल्याचे पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते. या पत्राचा विचार करूनच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांना तातडीने बैठक घेण्याची सूचनाही केली होती. दरम्यान, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे काही निधी शिल्लक आहे. त्यामध्ये अमरावती विभागाचा जवळपास १८00 कोटींचा निधी असल्याची माहिती आहे.
अमरावती विभागातील ३६ प्रकल्पांचे प्रस्ताव शासनाकडे
By admin | Updated: June 29, 2015 01:37 IST