जउळका (रेल्वे) पोलीस स्टेशनच्या वतीने काळामाथा येथे मंगरुळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात मालेगाव तहसीलदार रवी काळे यांच्या अध्यतेखाली गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची सभा घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हळूहळू सर्व व्यवसाय कोरोनाच्या नियम व अटीच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली आहे, परंतु कोरोनाचे भान ठेवत १० सप्टेंबरपासून सुरू होत असलेला गणेश उत्सव प्रत्येकाने सार्वजनिकरीत्या साजरा न करता घरीच कोरोना नियमांचे व अटींचे पालन करूनच अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी केले. या कार्यक्रमात तहसीलदार रवी काळे, संस्थानचे अध्यक्ष रामेश्वर गोंडाळ, माजी सरपंच संतोष राठोड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पोलीस पाटलांचा व कोरोना काळात पोलिसांना सहकार्य करणाऱ्या गणेश मंडाळांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला काळामाथा संस्थानचे उपाध्यक्ष उत्तम नाईक, अंबादास पाटील, रामकृष्ण पाटील, पं. स.चे कार्यकारी सभापती वैजनाथ आप्पा गोंडाळ, पो. पा. महादेव तायडे, रमेश नगरे, सीमा काबंळे, वैशाली गुडदे, आशा शिंदे, यांच्यासह जउळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे, किन्हीराजा पोलीस चौकीचे कर्मचारी नीलेश घुगे, महिंद्र दाभाडे, पोलीस मित्र संजय राठोड, तसेच पो. पाटील व गणेश मडंळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा : उपविभागीय पो. अधिकारी यशवंत केडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST