वाशिम : वाशिम येथील डॉक्टर रोशन बंग यांनी देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींचा मोफत उपचार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी तसे फलकच अनेक ठिकाणी लावून याबाबत जनजागृती केली आहे. पोलीस दलातील बांधवांसाठी सुध्दा उपचारात सूट दिली आहे.गत काही महिन्यांपूर्वी वाशिम येथीलच डॉ. सचिन पवार यांनी कन्यारत्नप्राप्त झाल्याने रुग्णांना मोफत उपचार देवून समाजसेवी उपक्रम राबविला होता. त्यापाठोपाठ वाशिम येथीलच डॉ. रोशन सुभाषचंद्र बंग यांनी देशसेवेसाठी झटणाऱ्या , देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींच्या उपचारासाठी कोणतीही फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये फलक लावले असून सोशल मिडीयावरही यासंदर्भात प्रचार केला आहे. तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती व वर्दळीच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. देशासाठी सिमेवर लढणाºया सैनिकांच्या मुलामुलींच्या मोफत उपचारासोबतच जिल्हा पोलीस दलातील बांधवांसाठी उपचारावर सूट देण्यात आली आहेत. देशासाठी सिमेवर लढून देशात राहणाऱ्या नागरिकांचे रक्षण करणाऱ्यांप्रती आपल्याकडूनही काही सेवा व्हावी हा दृष्टीकोनसमोर ठेवून या उपक्रमास सुरुवात केली आहे. सोशल मिडीयाव्दारे हा मॅसेज सर्वत्रच व्हायरल झाला असून लोकांच्या या शुभेच्छा येत असून कार्याचे कौतूक केल्या जात आहे. त्यांच्या या कौतुकामुळे बळ मिळत आहे.- डॉ. रोशन सुभाषचंद्र बंगवाशिम
देशासाठी सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मुलामुलींचा उपचार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:58 IST