मानोरा : भारतीय कृषी योजना शेतकरी मार्गदर्शन केंद्रद्वारा पुसद शेतकरी सेवा कार्ड व बेरोजगार सेवा कार्डवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावून शेतकरी व बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा प्रकार ९ मे रोजी समोर आला आहे. वाय.बी.एस. संस्थेचे सेवा कार्ड घेऊन ग्रामीण भागात अनेक तरुण तरुणी जाऊन शेतकर्यांकडून योजनेच्या नावावर कार्ड भरून घेऊन पैेसे घेत आहे. असाच प्रकार पाळोदी परिसरात आढळून आला. मनसेचे दारासिंह पवार यांनी त्यांना पकडून चौकशी केली असता पाळोदीत जवळपास दहा हजारांचे कार्ड त्यांनी भरून घेतले. मनसेच्या मध्यस्थीने त्यांनी पाळोदी येथील वसूल शेतकर्यांचे पैसे परत केले आहेत. ग्रामीण भागातील जनता योजनेच्या नावाने या प्रकाराला बळी पडत आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकार्यांनी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, काही लोकांना तपासाकरिता ताब्यात घेतले होते. याबाबत बीट जमादार डाबेराव यांनी सांगितले की, वरील प्रकरणी संस्था नोंदणी क्रमांक आम्ही धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांना पाठविले तसेच त्यांचे दिलेल्या पुसद, येथील कार्यालयावर गेलो असता मागील अनेक महिन्यापासून बंद असल्याचे समजले. तपास सुरु असून योग्य कार्यवाही करु, असे म्हणाले.
शेतक-यांची फसवणूक
By admin | Updated: May 11, 2015 02:02 IST