वाशिम : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे १५ एप्रिल रोजी शेतकर्यांचा सुमारे चार हजार क्विंटल माल पावसाच्या पाण्याने भिजला. एवढा गंभीर प्रकार घडूनही बाजार समितीच्या कार्यालयात शेतकर्यांचे गार्हाणे ऐकून घेण्यासाठी कुणीच जबाबदार व्यक्ती हजर नव्हती. तथापि, नैसर्गिक संकटांमुळे आधीच जेरीस आलेले शेतकरी अवकाळी पावसाच्या दणक्याचेही बळी ठरले आहेत. वाशिम जिल्ह्यात सर्वदूर गेल्या सात ते आठ दिवसांपासून वादळी वारा व अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. दररोज दुपारच्या सुमारास आकाशात ढग जमून विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात होत आहे. नित्यनेमाप्रमाणे १५ एप्रिल रोजीदेखील दुपारी ३ च्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. यादरम्यान कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये ओट्याच्या खाली ठेवण्यात आलेला हजारो क्विंटल हरभरा, सोयाबीन, तूर हा माल पावसाच्या तावडीत सापडला. सलग एक तास झालेल्या या पावसामुळे बाजार समितीत धान्यासभोवताल पाणीच पाणी साचले होते. बाजार समिती प्रशासनाने ओट्यावर माल ठेवू न दिल्यामुळे तद्वतच खरेदीस मोठा विलंब लावल्याने धान्य भिजल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्यांनी कैफियत मांडण्याकरिता बाजार समितीचे कार्यालय गाठले; मात्र यावेळी तेथे सचिवांसोबत इतर एकही जबाबदार व्यक्ती हजर नव्हती. १६ एप्रिल रोजी बाजार समिती बंद असल्याने पावसाच्या पाण्याने भिजलेले धान्य पुन्हा पोत्यात भरून घरी नेण्याशिवाय शेतकर्यांसमोर कुठलाही पर्याय राहिला नव्हता.
चार हजार क्विंटल माल भिजला
By admin | Updated: April 16, 2015 01:32 IST