वाशिम: सावली प्रतिष्ठानच्या पक्ष्यासाठी पाणपोई हा उपक्रम गेल्या महिनाभरापासून वाशिम शहरात यशस्वीरीत्या राबविल्या जात आहे. सावलीच्या सेल्फी विथ फिडर्स मोहिमे अंतर्गत पाणवठ्यात पाणी भरण्यासंदर्भात लहान मुलांपासून ते अनेक प्रौढ व्यक्तींचा अतिशय उत्साहाने सहभाग दिसून येत आहे. आज सावली प्रतिष्ठानची टीम जिजाऊ सभागृह आणि जि.प. शाळा परिसरातील पाणवठ्याचे रीफिलिंग करीत असताना एक आगळा-वेगळा उपक्रम पाहावयास मिळाला. निमित्त होते भागवत किसन अंभोरे यांच्या विवाह सोहळ्याचे. स्थानिक जिजाऊ सभागृहात विवाह सोहळ्यानिमित्त तयारी जय्यत सुरू असतानाच परंपरेला बगल देत बोहल्यावर चढण्याअगोदर नवरदेवाने जिजाऊ सभागृह परिसरातील सावली प्रतिष्ठानने लावलेल्या एकूण सात पाणवठ्यात पाणी भरून नवा आदर्श निर्माण केला. यावेळी विवाह सोहळ्यास आलेल्या पाहुण्यानी नवरदेव भागवत अंभोरे व सावलीच्या सदस्यांचे कौतुक केले. यावेळी सावली प्रतिष्ठानचे संयोजक राम धनगर, वैभव मुकुंद गौरकर, सुनील हेंद्रे (बाळा), ज्ञानेश्वर नवघरे, रोहिदास धनगर, प्रवीण होनमणे, रुपेश काबरा, आकाश अंबेकर इत्यादी सदस्यांनी नवदाम्पत्याच्या या कार्याचे स्वागत केले.
आधी लगीन पाणवठ्याचे!
By admin | Updated: April 25, 2017 01:54 IST