राजरत्न सिरसाट/अकोलाकृषी विद्यापीठांच्या नोकर भरतीचे आदेश अखेर गुरू वारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्राप्त झाले असून, एक वर्षापासून रखडलेली विद्यापीठांतील दोन हजाराच्यावर पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आदेशानुसार कनिष्ठ व वरीष्ठ सहाय्यक संशोधकांपर्यंतची पदं जुन्याच पध्दतीने भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाले आहेत. कृषी विद्यापीठ स्तरावर निवड समितीचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नोकर भरती निवड समितीच्या अध्यक्षपदी संशोधन संचालक डॉ. प्रदिप इंगोले यांची नेमणूक करण्यात आली आहे.गतवर्षी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि एक वर्षापासून हे मंडळच कार्यरत न झाल्याने कृषी विद्यापीठांची नोकर भरती प्रक्रिया रखडली होती. या अगोदरही कृषी विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येणार्या नोकर भरतीला अनेक अथडळे आले होते. त्यामुळे विद्यापीठांच्या नोकर भरतीचा अनुशेष वाढला आहे.अकोल्याच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील जवळपास पावणे हजार पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठाने गतवर्षी १७२ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. शासन आदेशानंतर सर्वप्रथम ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येणार आहे. परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ५00 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, येत्या १५ दिवसात यासाठी जाहीरात काढली जाणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पहिल्या टप्प्यात ६२५ पदे भरली जाणार आहेत. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठानेही नोकर भरतीच्या प्रकियेला सुरूवात केली आहे. *जुन्या पध्दतीत अंशत: बदल जुन्या नोकर भरती प्रक्रीयेमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. पूर्वी ४0 टक्के व्यक्तिगत माहिती आणि ६0 टक्के मुलाखती याप्रमाणे उमेदवारांना गुण देण्यात येत होते. नव्या पध्दतीत ५0 टक्के व्यक्तिगत (संशोधन, अनुभव) माहिती, ३0 टक्के गूण सादरीकरण, तसेच विषयाचे ज्ञान याला, तर २0 टक्के गुण मुलाखतीला दिले जाणार आहेत.
अखेर कृषी विद्यापीठांच्या नोकर भरतीचे आदेश धडकले !
By admin | Updated: November 14, 2014 01:13 IST