जिलह्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जवळपास ५ हेक्टरवरील बिजवाई कांदा, मूग, पपई, टरबूज, आंबा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले असून पुढील खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्मण झाला आहे. या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सर्वच तालुक्यांमधील पिकांचे नुकसान झाले. असे असतांना प्रशासनाने ४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु यामध्ये कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचे म्हणणे आहे. या भागातही वादळ वाऱ्यासह पाऊस येऊन अनेक घरांची पडझड झाली व पिकांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी संबधितांना निवेदनही दिले आहेत. तरी प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी करीत आहेत.
.......................
शिरपुरात सर्वाधिक बिजवाई कांद्याचे नुकसान
शिरपूर येथील शेतकरी काही वर्षापासून स्पर्धात्मक शेतीकडे वळले होते. कांदा बिजवाई, हळद असे खर्चिक पिके घेऊ लागले. गावामधील एकमेकाकडे पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी स्पर्धात्मक शेती करू लागले. परिणामतः वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर मध्ये आहेत. यावर्षी बिजवाई कांदा लागवडही शेकडो शेतकऱ्यांनी केली होती. मात्र गारपीट व वादळी पावसाने कांदा बिजवाई पीक उद्ध्वस्त करून टाकले. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडून शासनाकडून त्वरित योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शिरपूर येथील शेतकरी व्यक्त केली आहे. परिसरात पंचनामे करण्यात येत आहेत.
..............
शेतकऱ्यांची निवेदन
हाताताेंडाशी आलेला घास हिरावल्याने आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न करीत कृषी विभागाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.