वाशिम : हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने नाफेड खरेदी केंद्रावर येत आहेत. मात्र, पूर्वीच्याच तुरीची मोजणी न झाल्याने नाफेड केंद्रावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३६०० ते ४२०० दरम्यान तुरीला बाजारभाव मिळत आहे. हमीभावात तुरीची विक्री करण्यासाठी शेतकरी नाफेड केंद्रावर मोठ्या संख्येने जात आहेत. मात्र, बारदाण्याचा अभाव व अन्य कारणांमुळे नाफेडचे केंद्र मध्यंतरी बंद होते. त्यानंतर वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथील नाफेड केंद्र सुरू झाले, तर मालेगाव, रिसोड येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही बंदच आहे. वाशिम, मंगरूळपीर येथे पूर्वीच्याच तुरीची मोजणी सुरू आहे. त्यातही नवीन तूर विक्रीसाठी येत असल्याने बाजार समिती परिसरात शेतमालाच्या वाहनांची रांग लागत आहे. हमीभावात तुरीची विक्री करताना शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.मंगरुळपीर : मागील दहा दिवसांपासून बंद असलेली नाफेड तूर खरेदी शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांचे आक्रमकतेमुळे तत्काळ १७ एप्रिल रोजी दुपारपासून सुरू करण्यात आली.येथील नाफेड खरेदी केंद्र बंद असल्याने मागील दहा दिवसांपासून ताटकळत असलेला तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता. तुरीचे खचाखच भरलेली पोती, भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टरमध्ये होती. मात्र तूर खरेदीचा मुहूर्त निघेना, शेवटी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी प्रभारी तहसीलदार यांच्या मदतीने उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांच्याशी सोमवारी चर्चा केली. शेतकऱ्यांची गैरसोय खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा सेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील यांनी दिला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून संबंधिताना या प्रकाराबाबत गंभीरता दर्शवून तत्काळ तूर खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी दुपारी दोन वाजतापासून नाफेडची तूर खरेदीस प्रारंभ झाला. यामुळे मागील दहा दिवसांपासून नाफेड केंद्रावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. मंगरूळपीर नाफेड केंद्र परिसरात शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रिसोड : येथील नाफेड खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. सात दिवसांची मुदतवाढ देऊनही नाफेड केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कमी बाजारभावाने अन्यत्र तूर विकण्याची वेळ आली आहे. बाजार समिती किंवा अन्य खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नाफेड केंद्रांवर कसरत!
By admin | Updated: April 18, 2017 01:25 IST