वाशिम: रासायनिक खते व बी-बियाण्याच्या किमतीचे दरपत्रक न लावता जिल्ह्यातील अनेक कृषिसेवा केंद्रं शेतकर्यांची कशी लूट करीत आहेत, याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने समोर आणताच कृषी विभागात एकच धावपळ सुरू झाली. सोमवार व मंगळवारी जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची तपासणी करून माहितीदर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले. वाशिम शहरातील कृषिसेवा केंद्रांमध्ये आता माहितीदर्शक फलक झळकत आहेत. पेरणीसाठी विविध प्रकारची खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. खते व बियाण्याच्या छापील किमती व शासकीय किमती, यामध्ये थोडीफार तफावत असल्याने शेतकर्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर संबंधित कृषिसेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासकीय किमतीचे दरपत्रक, उपलब्ध साठा, तक्रारपेटी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचनाही जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने सर्व कृषिसेवा केंद्रांना दिलेल्या आहेत. तथापि, काही कृषिसेवा केंद्रांनी माहितीदर्शक फलक न लावल्याने शेतकर्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता बळावली होती. यासंदर्भात ५ जून रोजी ह्यलोकमतह्ण चमूने प्रातिनिधीक स्वरूपात वाशिम शहरातील दहा कृषिसेवा केंद्रांची पाहणी केली असता, आठ दुकानांमध्ये रासायनिक खते व बी-बियाण्यांचे दरपत्रक व उपलब्ध साठा दर्शविणारे अद्ययावत फलक आढळून आले नव्हते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच, कृषी विभागाने वाशिम शहरासह जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची तपासणी करून माहितीदर्शक फलक लावण्याची मोहीम उघडली. वाशिम शहरातील कृषिसेवा केंद्रांमध्ये आता माहितीदर्शक फलक झळकत असल्याचे दिसून येत आहे.
कृषिसेवा केंद्रात झळकले फलक!
By admin | Updated: June 9, 2016 02:31 IST