शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रिसोड तालुक्यातील केशवनगर हे गाव आहे. गाव तसे छोटेसेच आहे. मात्र येथे गोवर्धना, शेलगाव, वाघी, मसलापेन, किनखेडा, पेडगाव, चिंचाबा पेन, दापुरी, येवता या गावची लोक विविध कामासाठी नियमित येत असतात. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांमुळे येथे काही वर्षांपासून अवैध धंदे सुरू झाले आहेत. हे धंदे राजरोस खुलेआम सुरू आहेत. या अवैध धंद्यामुळे लोकांची लुबाडणूक होत आहे. घरातील व्यसनाधीन व्यक्तीमुळे विशेषत: कष्टकरी महिलांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पवयीन मुलेही जुगाराचा आहारी जात आहेत. तसेच सध्या कोरोना काळामध्ये अवैध धंद्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ शकतो. करिता अवैध जुगार धंदे बंद करणे अतिशय गरजेचे आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे धंदे बंद करण्यात यावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायतने अवैध धंदे कायम बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये २२ मार्च रोजी ठराव बिनविरोध पारित केला आहे. तरीही अवैध धंदे सुरूच आहेत. ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ठरावाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी वाशिम, जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम व पोलीस निरीक्षक शिरपूर यांना २० मे रोजी पाठविण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही अवैध धंदे सुरू असून प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही.
............................