वाशिम : शासकीय तसेच खासगी बांधकामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या बांधकाम साहित्यासाठी शासकीय खदानी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने अभ्यास गटाची स्थापना केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १३ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासनाच्या विविध विभागांसाठी इमारती व रस्त्यांची बांधकामे करण्यात येतात. या कामांसाठी मोठय़ा प्रमाणात खडी, मुरुम, वाळू व इतर साहित्य लागते. या साहित्याचे उत्खनन करण्यासाठी शासकीय जमिनीवर खदानी यापूर्वीच्या काळात उपलब्ध होत्या. तथापि सन १९८0 नंतर या खदानी मृतवत झाल्याने त्यांचा वापर करणे बंद झाले आहे.यामुळे आता सद्यस्थितीत प्रकल्पांची अंदाजपत्रके तयार करताना खासगी मालकीच्या खदानीमधून बांधकाम साहित्य उपलब्ध करुन घेणे आवश्यक ठरत आहे. क्षेत्रीयस्तरावर अंदाजपत्रके तयार करताना पूर्वीच्या पध्दतीप्रमाणे मृत शासकीय खदानीचा वापर अंदाजपत्रके तयार करताना करण्यात येतो. प्रत्यक्षात या खदानीमधून साहित्य उपलब्ध होत नसल्याने अंदाजपत्रके वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याने कामांच्या निविदा जास्त दराच्या येवून त्या स्विकृत करण्यासाठी बराच कालावधी लागत आहे.तसेच प्रकल्पाची कामे कालर्मयादेत पूर्ण करणे शक्य होत नसल्याने विलंब होतो. कंत्राटदारांमार्फत या संदर्भात दावेही शासनाकडे होत आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय जमिनीमध्ये कोणत्या ठिकाणी खदानी उपलब्ध करुन देता येतील, याचा अभ्यास करुन त्याची निश्चिती केल्यास अंदाजपत्रके तयार करताना वस्तुस्थितीशी सुसंगत अंदाजपत्रके तसेच कामांच्या किंमती कमी करता येणे शक्य आहे. यामुळे निविदा प्रक्रियाही सुरळीत पार पडून कामे विहित कालर्मयादेत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
शासकीय खदानी उपलब्ध करुन देण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना
By admin | Updated: February 19, 2015 01:52 IST