मालेगाव : तालुक्यातील भेरा, केळी, वडप, एकांबा, डोंगरकिन्ही, पांगरी कुटे यासह आणखी काही गावातील स्ट्रिट लाईट पोलवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारा लोंबळकत असून त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावात व शेती परिसरात लोंबकळलेल्या विद्युत तारेकडे महावितरण कंपनीचे काम करण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष होत असून सदर लोंबकळलेल्या तारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे शहरासह ग्रामीण भागात १२ ते १४ तास भारनियमन होत आहे. त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात मालेगाव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य संजय भुजंगराव देशमुख यांनी कनिष्ठ अभियंता मालेगाव, मुख्य अभियंता वाशिम, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनाही निवेदन दिली आहेत. यासंदर्भात ठराव घेतला होता. परंतु यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. जर या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास विज वितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनाच जबाबदार धरण्यात येईल तरी या कामात जो कोणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पं.स. सदस्य संजय देशमुख यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील विद्युत खांबावरील तारा लोंबकळल्या
By admin | Updated: May 28, 2014 23:37 IST