लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकाऱ्यांना पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी विविध विषयांसंबंधी सूचना करणे आणि आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या शिक्षण विभागात काही वर्षांपूर्वी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ संच (व्ही.सी.) बसविण्यात आले होते. सध्या मात्र बहुतांश ठिकाणचे व्ही.सी. संच बंद असून, धूळ खात पडले आहेत. शिक्षण विभागातील विविध योजना, कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर विविध बैठकांचे आयोजन करावे लागते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचाऱ्यांना जिल्ह्याची वारी करावी लागते. त्यासाठी संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ खर्च होतो आणि त्याचा इतर कामांवरही परिणाम होतो. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्यावतीने पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क व्हावा, त्यांना सूचना व मार्गदर्शन करणे सोपे व्हावे, तसेच बैठकांचा खर्च, वेळ आणि ताण कमी व्हावा म्हणून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’वर चर्चा करण्यासाठी व्ही.सी. संच बसविण्यात आला; परंतु यामधील बहुतांश व्ही.सी. संच बंद पडले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा बैठकांचेच नियोजन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोय व्हावी, महत्त्वाच्या कामकाजाविषयी व्ही.सी.वरच चर्चा होऊन प्रश्न निकाली निघावेत, यासाठी व्ही.सी. संच पुरविण्यात आले. त्याचा वापर होणे क्रमप्राप्त आहे. यासंबंधी पंचायत समितीच्या शिक्षण विभागांना सूचना दिल्या जातील.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, वाशिम
शिक्षण विभागातील ‘व्हीसी’ संच धूळ खात!
By admin | Updated: May 15, 2017 01:26 IST