विवेक चांदूरकर शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: वेगळ्या विदर्भाच्या लढय़ाकरिता तरुणांपासून तर वृद्धापर्यंत सर्वच जण रिंगणात उतरले असून, विविध मार्गाने वेगळ्या विदर्भाचा लढा लढण्यात येत आहे. विदर्भातील तरुणांच्यावतीने ई-मेल आंदोलन राबविण्यात येत असून, आतापर्यंत प्रधानमंत्री, राष्ट्रपतींसह विविध मान्यवरांना १ लाख ७ हजारांपेक्षा जास्त मेल पाठविण्यात आले आहेत. गत अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी असून, आतापर्यंत शासनाच्यावतीने ही मागणी डावलण्यात आली आहे. आता मात्र विदर्भ वेगळा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा वज्रनिर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. विदर्भ वेगळा करण्याकरिता विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. यातीलच एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीच्यावतीने ई -मेल आंदोलन राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, केंद्रिय गृहमंत्री, केंद्रिय भुपृष्ठ व वाहतूक मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत लाखाच्यावर मेल पाठविण्यात आले असून, यानंतरही मेल पाठविण्यात येत आहे. या मेलमुळे वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाची धग प्रधानमंत्री व राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. या मेलमध्ये विदर्भावर आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना कशाप्रकारे अन्याय केला. विदर्भाचा हक्क कशाप्रकारे नाकारण्यात आला व स्वत:चा विकास साधून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. या मेलमुळे राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही विदर्भातील आंदोलन पेट घेतल्याचे लक्षात आले असून हा अखंड महाराष्ट्रासाठी धोका असल्याचे मान्य केले असल्याचा दावा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. -मोबाइल हँग आंदोलनाने आमदार, खासदार त्रस्त! विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीच्यावतीने विदर्भातील आमदार व खासदारांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून त्यांचे मोबाइल हँग करण्याचे आंदोलन करण्यात आले. यावेळीही हजारो नागरिकांनी आमदार व खासदारांच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून त्यांचे मोबाइल हँग केले. या मॅसेजमध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी संसदेत व विधान भवनात करा, अशी मागणी करण्यात आली. तसेच वेगळ्य विदर्भाची मागणी केली नाही तर विदर्भात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही या मॅसेजद्वारे देण्यात आला आहे.-विदर्भाबाहेरील आमदारांना पाठविणार एसएमएस यावेळी विदर्भातील आमदार व खासदारांना संसद तसेच विधानभवनात आवाज उठविण्याची मागणी असलेले मॅसेज पाठविण्यात आले. यानंतर विदर्भाबाहेरील आमदार व खासदारांना विदर्भ वेगळा करण्याची मागणी असलेले मॅसेज पाठविण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.*****प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना ई -मेल पाठवून विदर्भाची मागणी आता जोर धरू लागली आहे, हे निदर्शनास आणून दिले. प्रधानमंत्री व राष्ट्रतीपर्यंत वेगळ्या विदर्भाची नितांत गरज असल्याची महिती पोहोचणे गरजेचे आहे. ई - मेल आंदोलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. तसेच मोबाइल हँग आंदोलनही चांगल्या प्रकारे राबविण्यात आले. यानंतरही आणखी अशाप्रकारे विविध आंदोलन करण्यात येणार आहे.- प्रदीप धामणकर युवक अध्यक्ष, पश्चिम विदर्भ, विदर्भ राज्य आंदोलन समिती.
वेगळय़ा विदर्भाच्या लढय़ाकरिता ई-मेल आंदोलन
By admin | Updated: September 12, 2016 02:33 IST