वाशिम : येथील बसस्थानकाच्या आवारात अनेक झाडे पूर्णत: वाळल्याने ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. कोणत्याही उपयोगात नसलेली सदर धोकादायक झाडे तोडून टाकणे गरजेचे ठरत आहे. पावसाळी वादळामुळे धोकादायक झाडे पडल्यास निष्पाप प्रवाशांचा बळी जाण्याची भिती व्यक्त होत आहे. साधारणत: ५0 वर्षांपूर्वी बसस्थानक परिसरात काही झाडे लावण्यात आली होती. यामधील तीन झाडे पुर्णत: वाळली आहेत. वाळलेल्या फांद्या कधी कोसळतील, याचा नेम नसल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसस्थानकाच्या मागील या वाळलेल्या झाडाचे खोड जिर्ण झालेले आहे. जोरात आलेल्या हवेमुळे किंवा माकडाने उडी मारल्यास हे खोड कोसळण्याची शक्यता अधिक आहे. या संभाव्य दुर्घटनेमुळे येणार्या जाणार्या प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्याच ठिकाणी अनेक वाहने असल्याने वाहनांचे नुकसान होण्याचीही शक्य ता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे बसस्थानकात येणार्या बसेस येथूनच येतात. या बसवर हे झाड कोसळल्यास अनेक प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे दुसरे वाळलेले वृक्ष महिलांच्या प्रसाधनगृहाजवळ आहे. अनेक वर्षापासून वाळलेले हे झाड कुजलेले आहे. ते केव्हा कोसळेल याची खात्री नाही. त्यामुळे महिला प्रवाशांना धोका होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. बसस्थानकाचा परिसर प्रवाशांनी फुलून गेलेला असतो. उन्हाळ्याच्या दिवसात सावलीचा आधार म्हणून ग्रामीण भागातील काही प्रवासी झाडाखाली हिरव्या झाडाखाली बसतात. मात्र येथेच वाळलेले झाड आणि तेही धोकादायक स्थितीत असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्णत: वाळलेली व धोकादायक बनलेली झाडे तोडून टाकणे आवश्यक ठरत आहे.
शुष्क झाडे बनली धोकादायक
By admin | Updated: July 19, 2014 01:07 IST