मनभा (वाशिम) : तालुक्यातील ग्राम मनभा व परिसरातील शेतातील कृषिपंपांचा विद्युत पुरवठा गेल्या १५ दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या सुलतानी संकटाने ते जेरीस आले आहेत. हे संकट सोडविण्याकरिता मनभावासीयांनी उंबर्डाबाजार येथील विद्युत उपकेंद्रावर धडक मोर्चासुद्धा नेला होता. यावर्षी शेतकर्यांवर एकामागोमाग संकटाची मालिकाच सुरू आहे. पावसाळा उशिरा सुरू झाला. पाऊस आल्यानंतर शेतकर्यांनी पेरण्या केल्या तोच त्याने दडी मारली. लाखो रू पयांचा खर्च वाया गेला. शेतकर्यांनी दुबार पेरण्या केल्यानंतर निसर्गाची थोडी-फार कृपा झाली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी आदी पिके जमली, पण पावसाने पुन्हा दडी मारली. शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. ओलिताची सोय असलेले शेतकरी आपली विहीर, बोअरवरील कृषिपंप चालू करून कसेबसे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना अनियमित विद्युत पुरवठय़ामुळे पिकांना पाणी देणेही अशक्य झाले आहे. या स्थितीमुळे शेतकरी पार त्रस्त झाले आहेत.
कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित
By admin | Updated: October 15, 2014 00:54 IST