मोहरी ( मंगरुळपीर, जि. वाशिम ) : मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी परिसरात शेतकर्यांचे हमी असलेले सोयाबीन पीक निसर्गाचा लहरीपणा आणि भारनियमनामुळे उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिवाळी साजरी करणेच अशक्य झाले आहे. यंदा अपुर्या पावसामुळे खरिपांची बहुतांश पिके नष्ट झाली. त्यातच शेतातील विहिरीला पाणी असतानाही विजेअभावी पिकाला पाणी देणे शक्य झाले नाही. निसर्गाच्या अबकृपेसह वीज वितरण कंपनीने शेतकर्यांची जणू थट्टाच चालविली आहे. शेतात पेरलेले बियाणे, खताचा आणि पेरणीचा खर्चदेखील निघत नसून, शेतकर्यांना वर्षभराच गाडा चालवायचा तरी कसा, हा प्रश्नही त्यांना पडला आहे.वीज वितरण कंपनीने जर वीजपुरवठा बरोबर केला असता, तर या संकटामधून शेतकरी बाहेर आला असता; परंतु शेतकर्यांच्या समस्येकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकर्यांचे सर्व स्वप्न भंग झाले आहे. * कपाशीवरही लाल्याचे आक्रमण कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले असून, खरिपातील इतर पिकांप्रमाणेच हे पिकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. कृषी विभागाने याबाबत त्वरित मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
मोहरी परिसरातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त
By admin | Updated: October 25, 2014 00:11 IST