यामध्ये राष्ट्रीय महामार्ग १६१ बी मालेगाव-रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचा ७ कि. मी. अंतर असलेला बिबखेडा या गावापासून शेनगाव जि. हिंगोली या रस्त्याला जोडणारा वन टाईम इम्प्राेव्हमेंट डांबरीकरणाचा रस्ता मंजूर होता. परंतु हा रिसोड शहरामधून जाणारा अत्यंत रहदारीचा मुख्य रस्ता असल्यामुळे हा रस्ता डांबरीकरणाचा न करता सिमेंट काँक्रिटीकरणाचा करण्यात यावा, याकरिता नागरिकांसह नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी होती. खा. भावनाताई गवळी यांनी या सर्व बाबीचा विचार करून अधिकाऱ्यांसह बैठका घेऊन सदर रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा ४५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करायला सांगून राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी मुंबई यांच्यामार्फत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्गाकडे पाठविला होता. या रस्त्याच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊन प्रत्यक्ष सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला सुरुवात करण्याची विनंती केली असता या रस्त्याला मान्यता देण्याचे कबूल केले. या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे खा. भावना गवळी यांनी सांगितले. वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ सी अंतर्गत मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार हे प्रमुख बाजारपेठेचे गाव व चौफुलावर येत असल्यामुळे महामार्गाच्या रहदारीमुळे या ठिकाणी नेहमी अपघात होऊन वाहतुकीकरिता खोळंबा होत होता. या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जनतेची बायपासची मागणी होती. ही बाब ना. गडकरी यांनी वेधून बायपासचे काम सुरू करण्याची मागणी केली असता त्वरित होणार होऊन काम करण्याचे मान्य केले. तसेच मतदारसंघातील व परिसरातील उर्वरित रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची मागणी केली, त्यालाही लवकरच मंजुरात मिळणार आहे.
रिसाेड शहरातील रस्त्यांसह जिल्हयातील ईतर रस्ता मंजुरीबाबत रस्ते विकासमंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:41 IST