वाकद : सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील रोपवाटिकेमध्ये आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत गृहिणींसाठी उपयुक्त निधरुर चुलीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी पर्यावरण संतुलन राखण्याबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गुरवार १४ ऑगस्ट रोजी मोठेगाव येथील रोपवाटिकेत अएकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत लागवड अधिकारी डी. बी. पोयाम यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासंदर्भात विविध वृक्षांचे बी संकलन, पारंपरिक वृक्ष लागवड, वृक्षदिंडीचे आयोजन याबाबत सखोल माहिती दिली. ए. एच. गोरे यांनी दुष्काळ निवारणासंदर्भात जलपुनर्भरण, शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करणे, गांडूळखत निर्मिती आदिंबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा विशेष भाग म्हणून निधरुर चुलीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मातीच्या साधारण चुलीप्रमाणेच निधरुर चुल आहे. या चुलीच्या तळाशी बीड धातूची चौरस आकाराची जाळी, तसेच त्या जाळीच्या खाली दोन फुट लांब आणि अर्धा फुट खोल नालीसारखा खड्डा असतो. त्या नालीद्वारे चुलीमधील इंधनाला सतत ऑक्सीजनचा पुरवठा होतो. त्यामुळे धुर न होता इंधन जळते आणि अन्नही लवकर शिजते. परिणामी कमी प्रमाणात इंधन जळून इंधनाची बचत होते. महत्त्वाची बाब म्हणजे या चुलीमुळे धूरच निघत नसल्याने गृहिणींना धुरापासून होणारे डोळय़ांचे आजार आणि फुफ्फुसांच्या आजाराची शक्यताच राहत नाही. रिसोडचे लागवड अधिकारी ए. एच. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच ज्येष्ठ शिक्षक न. श्री. कुरळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी वनविभागाचे कर्मचारी शेख हमीदभाई, लक्ष्मण चौधरी, विजय ठाकरे यांच्यासह बी. एल. खंदारे, सहाय्यक लागवड अधिकारी बी. के. उबाळे यांची उपस्थिती होती.
वनीकरण विभागाकडून निधरुर चुलीचे प्रात्यक्षिक
By admin | Updated: August 19, 2014 00:22 IST