जून २०२० पासून नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करण्यात आला नाही. राज्यातील वंचितांचा हा आकडा साडेतीन लाख असल्याचे जैन यांनी निवेदनात म्हटले आहे. धान्य मिळाले नसल्याने अनेक गोरगरिब शिधापत्रिकाधारकांसमोर अडचण निर्माण झाली आहे. धान्य पुरवठा यादीमध्ये समाविष्ट न केल्यामुळे नवीन कार्डधारक धान्य मिळण्यापासून वंचित राहिले. यासंदर्भात तहसील कार्यालयातील संबंधितांना विचारणा केली असता, जून २०२० पासून कोणत्याही नवीन कार्डधारकास धान्य पुरवठा करण्याबाबत शासनस्तरावरून सूचना नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनाकाळात ज्यांच्याजवळ शिधापत्रिका नाही, त्यांना आधार कार्ड दाखविल्यास धान्य पुरवठा केला जाईल, असा आदेश होता. त्याची पूर्तता झाली नाही. विद्यमान शासनाने परिपत्रकाद्वारे नमूद केले की जून २०२० पासून नवीन कार्डधारकांना धान्य पुरवठा करता येणार नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून, तो दूर करून धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जैन यांनी निवेदनात केली आहे.
नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:43 IST