किन्हीराजा (वाशिम) : औरंगाबाद-नागपूर हायवेवर अपघाताची मालिका सुरुच असून, मालेगावकडून शेलूबाजारकडे जाणार्या भरधाव ट्रकने १२ वर्षीय पूजा प्रकाश कुरकुटे रा. गणेशपूर या मुलीला जबर धडक दिली. या अपघातात या मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३0 वाजता घडली. औरंगाबाद-नागपूर हायवे हा अपघात प्रवणस्थळ बनला असून, काळामाथा, गिव्हा, गणेशपूर, किन्हीराजा, सोनाळा, चोरद फाटा इत्यादी ठिकाणी वारंवार अपघात होत असून, अनेकांना या अपघातात आपला प्राणही गमवावा लागला. यापूर्वी गणेशपूर फाट्यावर भरधाव इंडिका गाडीने एका मुलाला चिरडले होते तर आज पुन्हा तशाच प्रकारचा अपघात होऊन या अपघातात पूजा प्रकाश कुरकुटे ही १२ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीसह औरंगाबाद-नागपूर हायवे ओलांडत असताना घडला. मालेगावकडून भरधाव वेगाने शेलूबाजारकडे जात असताना एम.एच. ३५ ए.बी. ६२२८ या क्रमांकाच्या ट्रकने पूजा कुरकुटे या मुलीला जबरदस्त धडक दिली व या धडकेत पुजाचा जागीच मृत्यू झाला. ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला. यावेळी काही युवकांनी त्या ट्रकचा पाठलाग करून हिरंगी फाट्यावर ट्रक पकडला. यावेळी चालक ट्रक सोडून पळाला होता. जउळका पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला. पूजा कुरकुटे या मुलीचा अचानक अपघात होऊन त्यामध्ये पूजाचा जागीच मृत्यू झाल्यामुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली.
ट्रकच्या धडकेत मुलीचा मृत्यू
By admin | Updated: November 12, 2014 01:49 IST