..................
ना. चं. कांबळे यांचा सत्कार
वाशिम : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा शांतिनिकेतन महिला विकास समितीच्या अध्यक्ष शांताताई शिंदे यांनी ३१ जानेवारी रोजी ना. चं. कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. कांबळे यांना जाहीर झालेल्या मानाच्या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.
.................
कृषी विभागाकडून महिलांना प्रशिक्षण
मेडशी : मधुपक्षिका पालन व्यवसायातून दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. याअंतर्गत कृषी विभागाकडून येथे शुक्रवारी महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
...............
वाशिम-शेलू रस्त्यावर अवैध उत्खनन
वाशिम : येथून शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. याकडे लक्ष पुरविण्याची मागणी राहुल गायकवाड यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली.
..............
बसथांबा इतरत्र हलविण्याची मागणी
वाशिम : वाशिम ते रिसोड यादरम्यानच्या रस्त्यावर शहरानजीक वर्दळीच्या ठिकाणी बसथांबा देण्यात आला आहे. याठिकाणी एस.टी. थांबल्यानंतर वाहतूक विस्कळीत होत असून, हा थांबा इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी महेश धोंगडे यांनी सोमवारी आगारप्रमुखांकडे केली.
............
शेतातील ‘ऑटोस्विच’ हटविण्याची कारवाई
किन्हीराजा : परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषिपंपांवर ऑटोस्विच बसविण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते हटविण्याची कारवाई शनिवारी करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांनी दिली.
.............
कोचिंग क्लासेसमध्ये नियमांचे उल्लंघन
वाशिम : लॉकडाऊननंतर कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू झाले आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडाला किमान मास्क असणे आवश्यक आहे. असे असताना या नियमाचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे.
..............
वाशिममध्ये पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा
वाशिम : शहरातील पाटणी चौक, रिसोड नाका, शिवाजी चौक, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य चौकांमध्ये नियमित वर्दळ असते. असे असताना पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने कुठेही उभी केली जातात. यामुळे रहदारी विस्कळीत होत आहे.
.............
अवैध प्रवासी वाहतूक नियंत्रणाबाहेर
जऊळका रेल्वे : परिसरातील अनेक गावांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून हा प्रकार राजरोस सुरू असताना पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई करण्याबाबत महेश बरगट यांनी सोमवारी ठाणेदारांना निवेदन दिले.
.................
संकष्टी चतुर्थीला हिवरा येथे प्रचंड गर्दी
वाशिम : तालुक्यातील हिवरा गणपती या गावात असलेल्या गणेशाच्या मंदिरात संकष्टी चतुर्थीला, रविवारी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी बहुतांश नागरिक नियमाचे पालन करताना दिसून आले.