रिसोड : तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नीलगाय व रोही उद्ध्वस्त करत आहेत. नीलगाय व रोहींचा वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १९ जुलै रोजी वन विभागाकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले की, मांगवाडी परिसरात असलेल्या जंगलात रोही व नीलगायींनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. या परिसरात अडीचशे ते तीनशे नीलगायी व रोही असून, शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास ठिय्या मांडून ते उभे पीक उद्ध्वस्त करतात. परिणामी, या भागातील शेतकरी रोही व नीलगायीला त्रस्त झाले असून, कायमस्वरूपी यावर तोडगा काढावा, अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी वन विभागाला देऊन रोही व नीलगायींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर गणेशपूर शिवारातील शेतकरी शंकर देशमुख, संतोष देशमुख, तुकाराम देशमुख, छगन हजारे, अशोकराव देशमुख, अमोल देशमुख, सुभाष हजारे, रामराव देशमुख, अशोक तिडके, किशोर तिडके, केशव पावडे, प्रदीप पावडे, गणेश तिडके आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
०००००००
कोट
मांगवाडी, गणेशपूर शेतशिवारात रोही व नीलगायींनी अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांचे निवेदनसुद्धा प्राप्त झाले आहे. याबाबतची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल.
-संजय वानखडे,
क्षेत्र सहायक वन विभाग, रिसोड