वाशिम : ९ ते १२ एप्रिलदरम्यानच्या अवकाळी पाऊस व वादळ-वार्याने जिल्हय़ातील ७७0 हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांना अवकाळी फटका दिल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणातून समोर येत आहे. ९ ते १२ एप्रिलपर्यंत जिल्हय़ात वादळ-वारा आणि अवकाळी पावसाने ठाण मांडले होते. ऐन भरीस आलेला भाजीपाला, फळबागा उद्ध्वस्त होत असल्यामुळे शेतकर्यांच्या तोंडाला फेस आला. १२ एप्रिलला सायंकाळी ४ वाजेनंतर १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हय़ात सरासरी ११.८३ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस रिसोड तालुक्यात ३२ मिमी झाला आहे. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात १८.८0 मिमी, मालेगाव ७ मिमी, वाशिम व मानोरा प्रत्येकी ५ मिमी, तर मंगरुळपीर तालुका ३.२0 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रिसोड तालुक्यात २३२ हेक्टर, वाशिम तालुका १२५ हेक्टर, कारंजा व मानोरा प्रत्येकी ५0 हेक्टर, मालेगाव १00 हेक्टर, मंगरुळपीर २0८ असे एकूण ७७0 हेक्टरवरील रब्बी पीक, भाजीपाला, आंबा, फळबागेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस व वादळ वार्यामुळे १0९ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हसला येथील ६३ व टाकळी येथील ४६ घरांची पडझड झाली आहे. तर काजळेश्वर, भांमदेवी परिसरातील कांदा व केळी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चेतन गिरासे यांनी दिली. मालेगाव तालुक्यात १२ एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस चांगला बरसला. यामध्ये ४ गावातील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित गावचे पंचनामे सुरू आहेत. सर्व गावचे पंचनामे करून अंतिम अहवाल आल्यानंतर नुकसानाची निश्चित माहिती हाती येणार आहे. पंचनामे करताना कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना कर्मचार्यांना दिल्याची माहिती नायब तहसीलदार डाबेराव यांनी दिली.
७७0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By admin | Updated: April 14, 2015 01:19 IST