मालेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत सुकांडा शिवारातील एका शेतात मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांमधील वीज प्रवाहाच्या धक्क्याने चार रोहिंचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळ दरम्यान उघडकीस आली होती. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला होता. ही घटना आठवडाभरापूर्वी घडलेली असल्याने मृत रोही कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घटनास्थळीच मृत रोहींचा वैद्यकीय पंचनामा केला. त्या बाबतचा अहवाल पशुवैद्यकीय चिकित्सकांनी वनअधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर अहवाला नुसार चारही रोहींचा मृत्यू हा विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. महावितरणच्या स्थानिक वायरमनसह कनिष्ठ अभियंत्यांचा कर्तव्यातील कसूर व निष्काळजीपणा रोहींच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे यावरून सिद्ध झाले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी सुकांडा येथील वायरमन विनोद मोहळेसह महावितरणचे मेडशी येथील कनिष्ठ अभियंता देसले यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम २(१६) , २ (३५), ९, ३९(३) क ५१ नुसार गुन्हा दाखल करीत वायरमन सह कनिष्ठ अभियंत्यांना पुढील चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. नांदुरकर हे करीत आहेत.
-----------------
चारही रोहींचा मृत्यू हा विजेच्या धक्क्याने
पशुवैद्यकीय चिकित्सकांकडून प्राप्त अहवालानुसार चारही रोहींचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रोहींच्या मृत्यूस महावितरण कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचा कर्तव्यातील कसूर व हलगर्जी कारणीभूत असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.