व्यापारी सुभाष पुंडलिक बळी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ३० वर्षांच्या करारावर बाजार समितीचे गाळे भाड्याने घेतलेले आहेत. ते बाजार समितीला नियमित अदा केले जात आहे. बाजार समिती प्रशासन आणि आमच्यात कोणताही वाद नाही; मात्र विठ्ठल अमृता आरु हे बाजार समितीच्या संचालक पदावर असताना त्यांनी आपणास वारंवार पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास विनाकारण कुठलाही मुद्दा पुढे करून नोटीस बजावत असत. ३ ऑगस्ट २०२१ रोजी विठ्ठल आरु दुकानावर आले व दुकानाची जागा तुम्हाला दिलेल्या भाडेपट्ट्यापेक्षा अधिक आहे. २० हजार रुपये द्या नाहीतर तुमचे दुकान बंद करतो, अशी धमकी दिली.
याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली. पैसे दिल्यास ती मागे घेतो, अशी बतावणी केली. एकूणच या सर्व बाबींमुळे आपले मानसिक खच्चीकरण केले जात आहे. याबाबत शेजारचे दुकानदार सुनील वाळले यांच्याशी चर्चा केली असता, विठ्ठल आरू यांनी शाम तिवारी, दिलीप जिरवणकर, दिलीप पतंगे, भास्कर खैरे, श्रीराम जाधव, राजू राऊत, राजेश खडसे, देवेंद्र जोशी, शिवाजी सानप, नारायण सानप, भारत कोकाटे, मनोहर अग्रवाल, प्रकाश वायभासे यांना सुद्धा पैशाची मागणी केली व त्या सर्वांनी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली असे कळले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल आरू यांच्यावर कलम ३८५, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मुंढे करीत आहेत.