गत वर्षभरापासून राज्यात ठाण मांडून असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत अनेकांचे बळी घेतले. त्यात कोणाचे आई-वडिल, भाऊ-बहिण; तर कोणाची पत्नी पतीला सोडून गेली; मात्र कामरगाव येथे निराधारांचे नाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन सरोदे यांनाही कोरोना संसर्गाने आपल्या कवेत घेऊन त्यांचा मृत्यू झाला. सरोदे हे मुळचे मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहिवाशी होते. १५ वर्षांपूर्वी ते व्यवसायानिमित्त कामरगावात आले आणि कायमचे कामरगावचेच रहिवाशी झाले. कामरगावात त्यांचा प्रिंटींगप्रेसचा व्यवसाय होता. व्यवसायासोबतच त्यांना समाजकार्याची आवड होती. त्यांनी आतापर्यंत अनेक निराधारांना आधार दिला. रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या मनोरूग्णांना अनाथाश्रमात हक्काची जागा मिळवून दिली. शिवाय काही महिला मनोरूग्णांनादेखील महिला आश्रमात दाखल केल्याने त्यांच्यावरील संभाव्य अत्याचार टळले. असा हा निराधारांचा कैवारी कोरोनामुळे हिरावला गेला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकजण स्तब्ध झाले. कामरगाववासियांवर यामुळे मोठी शेाककळा पसरली.
कोरोनाने हिरावला निराधारांचा नाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST