मालेगाव : तालुक्यातील केळी गावात सात विहिरी व चार कूपनलिका असूनही गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाची पाणीपुरवठा योजना मागील १८ वर्षांपासून बंद असल्याने सर्वसुविधा असताना केळीवासी तहानलेलेच दिसून येत आहेत.केळी हे ८०० लोकवस्तीच गाव आहे. गावातील हातपंप व विहिरींना पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाजवळ मालेगाव लघू पाटबंधारे योजनेचा तलाव आहे. अवैध पाणी उपशामुळे हा तलाव कोरडा झाला आहे. त्यामुळे गावातील भूजल पातळीत घट झाली. सध्या ग्रामस्थ दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. गावाला टँंकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे. मालेगाव लघ्ू पाटबंधारे योजनेच्या प्रकल्पाच्या अप्पर स्ट्रिमला विहीर खोदून पाणीपुरवठा योजना सुरू केली होती. ती योजना १८ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पाणीटंचाईत अधिकच भर पडली आहे. गावात नवीन विहीर खोदल्यास पाणी लागते. त्यामुळे नवीन विहीर खोदावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतने पंचायत समितीला पाठविला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
१८ वर्षांपासून पाणीपुरवठा योजना बंद
By admin | Updated: April 25, 2017 01:51 IST