वाशिम : शहरातील हॉटेल, रेस्टॉरन्ट, धाबा येथील किचनमध्ये अस्वच्छता, भिंतीवर जाळे, घाण पाण्याने भांडी धुणे यांसह इतर प्रकार होत असल्याचे ह्यलोकमतह्णने १५ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. काही ठिकाणी मात्र स्वच्छताही दिसून आली. शहरातील अकोला रस्ता, हिंगोली रस्ता, पुसद रस्ता व रिसोड रस्त्यावरील काही हॉटेल, रेस्टॉरेन्ट व धाब्यांवर लोकमत चमूने भेट देऊन तेथील स्वयंपाकगृहाची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी अतिशय अस्वच्छता दिसून आली. अशा स्थितीत येथे येणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. स्वच्छतेअभावी अतिसार, पोटाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे. याकडे मात्र संबंधित विभागाचे लक्ष नसल्याचे दिसनू आले. काही धाब्यांचे किचन उघडे असल्याने त्यांना स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, अशा काही ठिकाणीही कांद्याची टरफले, घाण पाणी, मध्येच कुत्री बसलेली यासारखे अनेक प्रकार दिसून आले. काही हॉटेल, उपाहारगृहे, वाइन शॉप आदी ठिकाणांवर माठातील पिण्याचे पाणी ठेवण्याच्या बाजूला सर्वत्र चिखल दिसून आला.
असे केले स्टिंग
हिंगोली नाक्यावरील चार धाब्यासह दोन रेस्टॉरंटमध्ये आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता, प्रतिष्ठान मालकांनी स्वत:हून आपले किचन दाखविले. काही ठिकाणी माणसांची कमतरता असल्याने अस्वच्छता दिसून आली. रिसोड रस्त्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये भांडे धुणारा कर्मचारी चक्क अतिशय घाणेरड्या पाण्याने भांडे धुताना आढळून आला. वाशिम रस्त्यावरील एका धाब्यावर कुत्र्यांचा बिनधास्त वावर दिसून आला तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले. पुसदकडे जाणार्या रस्त्यावरील एका रेस्टाँरंटमध्ये किचनमध्ये 'नो एन्ट्री' असे फलक लावलेले आढळून आले. तेथील मालकाशी संपर्क केला असता, आम्ही स्वच्छता पाळतो, आपण पाहण्यास काही हरकत नाही, असे सांगून किचन दाखविले असता, तेथे स्वच्छता आढळून आली.
अशी असावी व्यवस्था
हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी मंडळी नीटनेटकी तथा स्वच्छतेला प्राधान्य देणारी असावीत. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वयंपाकगृह नियमित चकचकीत असायला हवे. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते, त्या स्वच्छ पाण्याने धुतलेली असाव्यात. पाण्याचे ग्लासही आतून-बाहेरून स्वच्छ असायला हवे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटप्रमाणेच शहराबाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यांचा आतील आणि बाहेरचा परिसर स्वच्छ असायला हवा. हॉटेल, रेस्टॉरंन्टमध्ये येणार्या ग्राहकांना सर्व सुविधा व स्वच्छ परिसर मिळणे गरजेचे आहे.