मानोरा (जि. वाशिम) : मानोरा शहराला लागून असलेल्या शिवाजी नगर येथील काही भागात ९ मार्चच्या सायंकाळच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसात झाडे कोसळून घरे जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, त्यावर ९ दिवस (१७ मार्च) उलटूनसुद्धा त्या कुटुंबांना वीज कनेक्शन जोडण्यात आले नसल्याने या भागातील नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. याबाबत स्थानिक वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता बोरकर यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनीच सांगितल्यामुळे या भागातील नागरिकांत रोष व्यक्त केल्या जात आहे. शिवाजी नगरातील १0 कुटुंबावर अचानक झालेल्या वादळी पावसामुळे संकट कोसळले होते. या नागरिकांना स्वत: जिल्हाधिकारी कुळकर्णी यांनी भेट देऊन मदतसुद्धा दिली; तसेच आमदार राजेंद्र पाटणी यांनीसुद्धा भेट देऊन घर उभारणीकरिता शासनाकडून मदत देण्याचे उपविभागीय अधिकारी यांना सांगितले होते. सर्वत्र यांची माहिती असताना वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता बोरकर यांना येथील वीजपुरवठा बंद असल्याची माहिती नाही, तरी वरिष्ठांनी नवीन मीटर देऊन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
नागरिक नऊ दिवसांपासून अंधारात
By admin | Updated: March 18, 2015 01:30 IST