जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात सरासरी क्षेत्राच्या ११४ टक्के क्षेत्रांवर गहू व हरभरा पिकाची लागवड झाली. यामध्ये गहू पेरणी क्षेत्र ३३ हजार ४८२ हेक्टर व हरभरा पेरणी क्षेत्र ५९ हजार ५३२ हेक्टर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाचा परिपक्व होण्याचा कालावधी पूर्ण झाला असून, पीक काढणीस आलेले आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा पिकाची काढणी चालू आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून शेतामध्ये सुकवणीकरिता ढीग लावलेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दि. १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे कापणी करून ठेवलेल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच त्याचे ढीग लावून झाकून ठेवावे किंवा शक्य असल्यास मळणी करून संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:41 IST